ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा प्रचार चालू होऊन दोन दिवस झाले होते. गावातले प्रचाराचे चित्र आता बरेच स्पष्ट झाले होते. कोण कोणाच्या बाजूला आहे अशा चर्चांना उत आला होता. तशी गावात १९५० पासून म्हणजे गावात ग्रामपंचायत स्थापन झाल्या पासून, नेहमीच दुरंगी लढत होती. आणि ह्या पंचवार्षिकला देखील हि स्थिती कायम होती. ह्या वर्षी देखील हि लढत पंधरा वर्षापासुनचे एकमेकाचे हाडवैरी नानासाहेब आणि भाऊसाहेब यांच्यात होती. त्यांच्या त्यांच्या पार्टीतली लोकं त्यांना प्रेमाने नाना आणि भाऊ म्हणायची. पण मागील पंधरा वर्षापासून नियमितपणे भाऊच जिंकत आले होते. आणि ह्या वर्षी देखील ते हे चित्र कायम ठेवतील असा त्यांच्या पार्टीला विश्वास होता. पण नानांनी देखील चंगच बांधला होता तीन वेळा झालेली हार ह्यावेळी होऊ द्यायची नाही. ह्यावेळी काय वाट्टेल ते झाले तरी निवडणूक आपण जिंकायची , असे त्यांनी ठरवले होते. त्यासाठी ते मागील दोन महिन्यापासून तयारीला लागले होते. नानासाहेब हे पांढरा पायजमा व पांढरा नेहरू कुर्ता घालत. त्या कपड्यांना नीळ मारून ते निळसर झालेले असायचे. त्या कुर्त्यात त्यांच्या ढेरीचा घुमत स्पष्ट दिसायचा. डोक्यावर कडक कांझी केलेली गांधी टोपी असायची. ह्या सर्वात त्यांचा काळा रंग मोठा खुलून दिसायचा. पण ह्या वर्षी मात्र त्यांनी निवडणुकीची घोषणा होण्या आधीच आपला पेहराव बदलला होता. त्या पेहेरावात जाकेटची भर पडली होती. आणि डोक्यावरची टोपी जाऊन भगव्या रंगाचा फेटा आला होता. फेटा बांधता यावा म्हणून त्यांनी आपल्या गडीला म्हणजे बाब्याला खास दहा दिवस तालुक्याच्या मंडप वाल्या कडे लावून दिले होते. बाब्या हा खूप हुशार आहे असे त्यांचे मत होते. आणि त्यांचा विश्वास देखील होता त्याच्यावर, कारण मागील वीस वर्षापासुन तो नानांकडेच कामाला होता. तसे नाना सहजा सहजी बदल स्वीकारणारे नव्हते. पण त्याच्या मुलाने हा बदल करायला लावला. त्याचे नाव विजय. तो तालुक्याच्या गावी शिकायला होता. एल एल बी करत होता. त्याचे काही भविष्य असो वा नसो पण त्याच्या नावाला इतिहास मात्र होता. वीस वर्षापुर्वी ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाच्या दिवशीच त्याचा जन्म झाला होता आणि ती निवडणूक नाना जिंकले होते. त्यामुळे तो नानांचा खूपच लाडका होता आणि एकुलता एक देखील. त्याचे हट्ट सहसा नाना टाळत नसत. त्यानंतर पाच वर्षांनी झालेल्या निवडणुकीत भाऊंचा विजय झाला आणि आजतागायत ते आपला विजय राखून होते. नानांची आर्थिक स्थिती चांगली होती आणि गावात त्यांच्या शब्दाला मान होता.
भाऊ हे वीस वर्षापूर्वी नानांसोबातच होते. त्यांचा विजयात भाउंचा वाटा खूप होता. पण त्यावेळच्या हारलेल्या आबांनी भाऊंच्या डोक्यात भरवले कि तुम्ही त्यांना जिंकवू शकता तर तुम्हीच निवडणूक लढून का नाही जिंकत. आणि भाऊ देखील तसेच विचार करू लागले. आपली एवढी मोठी भाऊबंदकी आहे तर का आपणच निवडणूक लढवू नये. आणि असा हा भाऊ निवडणूक जिंकल्यावर भाऊसाहेब झाला.
भाऊ हा तालमीत तयार झालेला पहिलवान गडी होता. त्याचा रंग उजळ होता. त्यावर दाढी शोभुन दिसायची. पंधरा वर्षात त्याने आपला चांगलाच जम बसवला होता. राजकीय बेरकेपणा त्याच्या अंगी चांगलाच बाणवला होता. परिसरातल्या आमदाराशी त्याचे चांगले संबंध होते. भाऊबंदकीचा पाठींबा आजतागायत कायम होता. लोकांशी प्रेमाने संवाद साधण्याची कला चांगली होती. आणि मुख्य म्हणजे आबासाहेबांच्या घराचा पाठींबा होता. हे आबासाहेब म्हणजे गावातील बडे प्रस्थ होते. त्याच्या ताब्यात गावालीत एकमेव शिक्षण संस्था होती. ह्याशिवाय गावातील सहकारी डेअरी चे ते चेअरमन होते.ह्या आबासाहेबकडून भाऊला आर्थिक मदत व्हायची.
पण ह्यावेळची गावातील राजकीय परिस्थिती वेगळी होती. त्यासाठी मागच्या वर्षी झालेली शिक्षण संस्थेतील निवडणूक जबाबदार होती. संस्थेची स्थापना झाल्यापासून ती आबासाहेबांच्या घराच्या ताब्यात होती. संस्थेची स्थापनाच मुळी आबासाहेबांच्या वडिलांनी केली होती. मागच्या तीन विजयामुळे भाऊची महत्वकांक्षा वाढली होती. त्याला संस्था ताब्यात घ्यायची होती. त्यासाठी त्याने आबासाहेबाविरुद्ध दंड थोपटले. आबासाहेब आता म्हातारे झाले आहेत, त्यांच्याकडून आता संस्था संभाळली जात नाही असा प्रचार त्याने चालू केला. शाळेतले शिक्षक देखील आबासाहेबांना कंटाळले होते. त्यांनी देखील भाऊला पाठींबा दिला. भाऊला वाटत होते किती दिवस आपण आबासाहेबांचे ऐकायचे. आता संस्था ताब्यात घेऊ नंतर डेअरी, आणि आपणच गावाचे सर्वेसर्वा होऊ. पण तसे झाले नाही आबासाहेबांनी आपली सर्व शक्ती पणाला लावली आणि संस्था आपल्याच ताब्यात ठेवली व आपला मुलगा प्रकाश याला चेअरमन बनवले. ह्यासार्वाचा परिणाम म्हणजे आबासाहेब आणि भाऊ ह्याच्यात कटुता निर्माण होण्यात झाला. म्हणुन आबासाहेब ह्यावेळी भाऊला पाठींबा देत नव्हते.
विजय नाना बैठकीच्या खोलीत बसले होते आणि इतरही काही लोक होते. हि बैठकीची खोली म्हणजे निवडणुकीचे कार्यालयच झाले होते. खाली सतरंजी आथरलेली होती. त्यावर गावातले लोक बसलेले होते. भिंतीला टेकून गादीवर नाना बसलेले होते. काही लोक मतदार याद्या चाळत होते. काही तंबाकू मळत होते. काही उगाचच काहीतरी गप्पा मारत होते. दरवाजाच्या बाजूला पिण्याच्या पाण्याचा हंडा ठेवला होता. भिंतीला लागूनच निवडणुकीचे प्रचार पत्रकांचा गठ्ठा सुतळी बांधून ठेवलेला होता.
आज सकाळपासूनच विजय अस्वस्थ होता. सकाळीच बाब्याने त्याला माहिती दिली होती कि गावातले शिक्षक भाऊचा प्रचार करत आहेत. गावात शिक्षकांना मान होता, त्यामुळे हा प्रचार आपल्याला महागात पडू शकतो असे त्याला वाटत होते. ह्या परिस्थिती वर काय तोडगा काढायचा याचा विचार तो करत होता. आबासाहेब भाऊला पाठींबा देत नव्हते तसा विरोध पण करत नव्हते. ह्या निवडणुकीत आपल्याला आबासाहेबांची गरज पडेल हे त्याने हेरले. त्यासाठी नानांना तयार करणे गरजेचे होते. विजयचा चिंताक्रांत चेहरा पाहून नानांनी विजयला विचारले. “काय प्रचार कसा चालू आहे ?”
“चांगला चालू आहे.” विजयने उत्तर दिले.
“काय झाले फारच चिंतेत दिसातोयेस?” नाना म्हणाले.
“हो चिंता करण्यासारखच कारण आहे.” विजय.
“का काय झाले?” नाना.
“भाऊचा प्रचार ती शाळेतली मास्तर पण करतायेत कि” विजय म्हणाला.
“त्याने काय होत नाही. ह्यावेळी आपणच जिंकणार. आणि आबासाहेब काही त्याला पाठींबा देणार न्हाई ह्यावेळी. अहो आणि मास्तर तोडून तोडून किती मत तोडणार पाच पन्नास मतांनी काही होणार नाही. काय हो?” असे म्हणुन नानांनी समोर बसलेल्या एकाकडे पहिले.
“होय कि, इलेक्शन आपणच जिंकणार…” समोर बसलेली व्यक्ती उद्गारली.
त्या व्यक्तीचे बोलणे मधेच तोडत विजय बोलला. “तसं नाही नाना. आबासाहेब जसा पाठींबा देत नाहीयेत तसा विरोध पण करत नाहीयेत. आणि पाच पन्नास मतांची काय बात नाना, मागच्या वेळी दगडू दोन मतांनी पडला चार नंबर वार्डात . काय दगडू?”
“होय कि. नाना इलेक्शन म्हटले कि एक एक मत महत्वाच असतं बघा.” होकारार्थी मान हलवत दगडूने उत्तर दिले.
“मग..” असे म्हणुन विजय ने नाना कडे पहिले.
नानांना विजयाचे बोलणे पटले. ‘हि गोष्ट खरंच होती कि ग्रामपाच्यायातीत एक एक मत महत्वाचे असते. आणि शाळेतले पंधरा मास्तर, एकेकाने दहा दहा मते जरी फोडली तरी दीडशे होतात. काही मास्तर गावातले होते आणि काही इथेच बऱ्याच वर्ष्यापासून राहत असल्यामुळे त्याची देखील नाव मतदार यादीत आले आहे. अशी एकूण टोटल केली तर दीड दोनशे मते जातील. दीड दोनशे मते म्हणजे आपला पराभवाच.’ असा विचार करतच नानांनी प्रश्नार्थक मुद्रेने विचारले.”मग काय करायचे म्हनतोयेस?”
“निवडणूक जिंकायची तर आपल्याला आबासाहेबांचा पाठींबा लागेल.” विजय ठामपणे म्हणाला.
बसलेली मंडळी एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहू लागली. सारे वातावरण शांत झाले.
“ते शक्य नाही.” नाना थोडे रागात म्हणाले.
“नाना जर आबासाहेब आपल्याकडे आले तर आपल्याला त्यांचा फार फायदा होईल. आणि राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो. सर्व गोष्टी गरजेवर अवलंबून असतात.” विजय समजावणीच्या सुरात म्हणाला.
थोडा वेळ शांतता पसरली. नाना विचार करत होते. आणि दगडू बोलला. “पण आबासाहेब आपल्याकडे येतील का?”
“नाही.” विजय.
दगडू गोंधळून म्हणाला “मग..?”
विजय स्मित करत म्हणाला “आपल्याला त्यांच्याकडे जावे लागेल मदत मागायला.”
“म्हणजे आपण त्याची पायरी चढून जाऊ म्हनतोयेस?” चेहऱ्यावर विचित्र भाव आणत नाना म्हणाले.
“होय नाना. ज्याच्या पोटात दुखत असेल त्यानेच ओवा मागायचा असतो. नाना थोडा शांतपणे विचार करा. हि निवडणूक आपल्याला कोणत्याही परिस्थितीत जिंकायचीच आहे असे तुम्हीच म्हणाला होतात ना.” विजय.
“पण आबासाहेब ऐकतील का..?” दगडूने प्रश्न उपस्थित केला.
“ते काम माझ्याकडे लागले. प्रत्येकजन मानाचा भुकेला असतो.” विजयने उत्तर दिले.
आता ह्यावर काय बोलावे हे नानांना सुचत नव्हते. थोडा वेळ तसाच गेला. आणि विचार करून नाना म्हणाले “ठीक आहे. बाब्याला पाठवून दे आबासाहेबाकडे.. संध्याकाळी भेटायला येतोय म्हणुन सांग.”
नाना उठून आतमध्ये गेले. विजयाच्या चेहऱ्यावर स्मित पसरले. आणि बसलेल्या मंडळींना पण आनंद झाला. जर असे झाले तर जीत पक्की.
दगडू आणि बाकीची मंडळी पण जायला उठली आणि उठता उठता दगडू बोलला “हा डाव चांगला आहे बघा”.
“इलेक्शन म्हणजे डावपेच आलेच” हसत हसत विजय बोलला. मंडळी पण हसत हसत दरवाजा बाहेर जाऊ लागली. त्यांना थांबवत विजय बोलला. “हे बघा पण हा डाव कोणालाही कळू देऊ नका”
सर्वानी एकसुरात ‘नाही, नाही’ म्हणत नाकारार्थक माना हलवल्या. आणि निघून गेली.
मंडळी गेल्याचे पाहून नाना बैठकीच्या खोलीत परतले. आणि विजय कडे पाहत म्हणाले. “हे योग्य होईल का?”
“हो नक्कीच. तुम्ही काही चिंता करू नका. मी सर्व बरोबर करतो.” विजय म्हणाला.
“पण आबासाहेबाला कसा पटवायचा?” नाना.
“आपण त्यांना भेटलो कि सर्व बरोबर होईल. चला जेवण करून घेऊ.” विजय स्वयंपाक घराकडे पाहत बोलला.
“ठीक आहे.” दोघेही स्वयंपाक घराकडे गेले.
दुपारी जेवण करून विजय बैठकीच्या खोलीत आला. नाना आधीच आले होते. बाब्या बाहेरच बसला होता. विजयने बाब्याला हाक मारली. बाब्या आत आला व म्हणाला “हाक मारलीत विजय दादा ?”
“होय. एक निरोप द्यायचा आहे.” विजय.
“देतो कि कोणाला ?” बाब्या थोडा पुढे सरकला.
“आबासाहेबांना” विजय चेहऱ्यावरचे गांभीर्य तसेच ठेवत बोलला.
“आबासाहेबांना..?” बाब्याने एकवार नानांकडे पहिले. “काय निरोप आहे.”
नाना मधेच बोलले.”आबांना सांग नानांना भेटायचे आहे म्हणुन. संध्याकाळी आले तर चालेल का?”
“नाही आबा आज संध्याकाळी नको. उद्या सकाळी जायचे भेटायला.” विजय म्हणाला.
“आता काय झाले उद्या काय मुहूर्त आहे होय. हे काम जितक्या लवकर झाले तितके चांगले. आणि सकाळी आपले ठरले होते ना संध्यकाळी जायचे म्हणुन.” नाना थोडे त्रासिक होऊन बोलले.
“हो. पण ते आपण गावातल्या मंडळी समोर बोललो होतो.” विजय म्हणाला.
“अस कोड्यात काय बोलतोयेस. स्पष्ट सांग.” नाना म्हणाले.
“अहो नाना आपण संध्याकाळी भेटायला जाणार हे भाऊला एव्हाना कळले असेल. आणि तो देखील येईल तिथे संध्याकाळी. मग बोलणे तर सोडाच जाता सुध्दा येणार नाही तिथे. आणि आधी त्यांना भेटून घेऊ द्या. आपले लोक बरोबर माहिती सांगतील कि त्याचे काय बोलणे झाले. आपण मग त्या प्रमाणे विव्ह रचना करायची.” विजय ने सर्व स्पष्ट केले. नानांच्या डोक्यात प्रकाश पडला.
“बाब्या विजयने सांगितल्या प्रमाणे उद्या सकाळी येणार म्हणुन सांग आणि हो आजूबाजूला कोणी नाही याची खात्री करून मगच हा निरोप आबासाहेबांना दे. आणि हो तू देखील कोणाला कळू देऊ नकोस.” नानांनी हुकुम सोडला.
बाब्याला अशी कामे फार आवडायची. होय म्हणुन तो घाईघाईत निघून गेला.
तेवढ्यात विजयला गावातली मंडळी येताना दिसली. तो नानांकडे बघून म्हणाला “आता ह्या गोष्टीची चर्चा नको. मंडळी येतायेत” हे बोलून त्याने डोळ्यांनीच दरवाजाकडे खून केली.
नाना फक्त हं म्हणाले.
गावातली मंडळी आत आली. “राम राम” नानांनी पण राम राम केले. विजयने पण दोन्ही हात जोडून स्मित करत राम राम केले. नानांनी परवा होणाऱ्या प्रचार फेरीचा विषय काढला. व चर्चा सुरु झाली.
इकडे भाऊंना बातमी कळली होती. ते विचार करत आपल्या आराम खुर्चीत बसले होते आणि इतर जमलेली मंडळी खाली सतरंजी वर तर्क लढवत बसले होते. सुधाकर मधेच बोलला “मला नाही वाटत नाना आबासाहेबाकडे जाईल म्हणुन” तेवढ्यात प्रमोद आत आला. हा प्रमोद म्हणजे भाऊंचा मोठा मुलगा. तो म्हणाला “तुम्हाला नाही वाटून काय होतं, मला आत्ता पक्की बातमी आली आहे. नानाचा गडी बाब्या आबासाहेबांच्या घरात जाताना दिसला.”
“आता काय करायचे भाऊ ? जर आबासाहेब नानाला मिळाले तर थोडे कठीण होईल आपल्यासाठी.” सुधाकर म्हणाला.
भाऊ विचार करू लागले. तसे सर्व शांत झाले. थोडा वेळ तसाच गेला. मग शामराव शांतता तोडत म्हणाले. “भाऊ आपण आबासाहेबाची भेट घेतली पाहीजे.”
हे ऐकून प्रमोद रागात बोलला “काय बोलताय काय काका तुम्ही? त्या आबासाहेबाच्या पायरी चढायची म्हणता. उद्या म्हणाल नानाकडे चला.”
“प्रमोद!!” भाऊंनी आवाज चढवला. “जरा शांत हो काय म्हणतायेत ते तरी ऐकून घे”
“म्हणा” खाली बसत प्रमोद म्हणाला.
सगळे लोक शामारावाकडे पाहू लागली. शामराव हे भाऊच्या भाऊबंदकीतले होते. ते खूप विचारी होते. आणि महत्वाचे तेवढेच बोलत असत. ते वयाने भाऊ पेक्षा मोठे होते.
भाऊ शामरावाकडे पाहत म्हणाले “बोला शामराव काय म्हणतात.”
शामराव दीर्घ श्वास घेऊन म्हणाले. ”मला असे वाटते कि आपण आबासाहेबांची भेट घ्यावी. आणि झालेगेले विसरून पुन्हा एकत्र येण्याची विनंती करावी. जर नानाला त्यांनी पाडायला मदत केलेली असताना नाना तिकडे मदत मागायला चाललाय तर आपल्याला तर त्यांनी नेहमीच मदत केलेली आहे. झाल्या प्रकाराबद्दल आपण त्यांची माफी मागू. आणि जर त्यांनी माफ केले आणि आपल्याला मदत केली तर आजच हार गळ्यात टाकल्यासारखे होईल.”
“पण खरंच आबासाहेब आल्यामुळे आपल्याला काही फरक पडणार आहे का?” भाऊंनी शांतपणे विचारले “कारण तसा त्यांचा आपल्याला काय उपयोग आहे. आणि सारे शिक्षकांची तर आपल्यालाच साथ आहे.”
“भाऊ ते आपल्याकडे आल्याने आपल्याला काही फरक पडणार नाही हे खरे.” शामराव बोलत होते. प्रमोदच्या चेहऱ्यावर कुत्सित हासू उमटले आणि पुढचे वाक्य ऐकून मावळले देखील. “पण जर ते नानाकडे गेले तर मात्र आपल्याला मोठा फरक पडेल.”
थोड दम घेऊन शामराव पुन्हा बोलू लागले. “विसरू नका संस्था त्यांच्याच ताब्यात आहे. त्यांनी शिक्षकांच्या दोऱ्या आवळताच शिक्षक गप्प होतील.”
भाऊंना सर्व पटले. त्यांनी प्रमोद कडे पहिले. प्रमोदने पण होकारार्थी मान हलवली. खोलीतल्या सर्वाना शामारावाचे बोलणे पटले.
“किती वाजता जाणार आहेत ते” प्रमोद कडे पाहत भाऊंनी विचारले.
“सात वाजता” प्रमोद म्हणाला.
“ठीक आहे मग आपण आठ वाजता जाऊया. आणि त्यांचा बेत हाणून पडूया. काय शामराव?” प्रश्नार्थक मुद्रेने भाऊंनी शामारावाकडे पहिले. त्यांनी होकारार्थी मान हलवली.
इकडे बाब्या आबासाहेबांना निरोप सांगत होता. “आबा मला नानांनी निरोप देण्यासाठी धाडलंय”
“काय निरोप आहे.” आबासाहेब.
“जी त्यांना तुम्हाला भेटायचे आहे.” बाब्या.
“कशासाठी” आबासाहेब.
“कशासाठी ते काय माहित नाही पण उद्या सकाळी भेटायला येऊ का म्हणुन विचारलय” बाब्या.
“हं… असं.. ” एवढे बोलून आबासाहेब गप्प झाले.
बाब्या तिथेच उभा होता. थोडा वेळ तसाच गेला आणि हिम्मत करून बाब्याने परत विचारले. “आबासाहेब काय उत्तर देऊ?”
“ठीक आहे. या म्हणावं उद्या सकाळी.” एवढे बोलून आबा परत विचारात गर्क झाले.
बाब्या तेथून निघाला. सरळ नानांकडे गेला.
इकडे आबासाहेब बंगाळीवर बसून विचार करत होते. ‘काय काम असेल. इतक्या वर्षानंतर नानाचा निरोप. इलेक्शन लागलय, त्यामुळेच कदाचित हि भेट असावी. आपला पाठींबा मागत असेल निवडणुकीसाठी. हे चांगलच होईल. असाही तो भाऊ खुपच मुजोर झाला आहे. माझीच संस्था गिळायला बघत होता. ह्या निमित्ताने त्याला पण धडा शिकवता येयील. पण अजून काय फायदा होऊ शकतो आपला ते पण विचार करायला हवा. हा वरच्या वावराकडे जायला गाडीवाट नाही. मध्ये तो नानाच्या कंपू मधल्या महाद्याचे वावर आहे. जर ती गाडीवाट मिळाली तर आपले बरेच प्रश्न सुटतील. आणि तो नानाच्या भाऊबंदकीतला माणूस आहे त्याचे तो ऐकेल. आणि एखाद दोन गावठाण मधले प्लॉट मिळाले तर बघू. म्हणजे आपला पण फायदा बघितलाच पाहिजे कि.’
बाब्या आला आणि दरवाज्यातच उभा राहिला इतक्यात विजय म्हणाला. बाब्या जरा चहाचे सांगरे आतमध्ये. बाब्या आत गेला. त्यापाठोपाठ विजय पण आत गेला. बाब्या आत उभा होता. विजयने अधीरतेने दबक्या आवाजात विचारले “काय झाले?”
“त्यांनी मान्य केले. उद्या सकाळी या म्हणुन सांगितलंय.” बाब्याने उत्तर दिले.
“व्वा, झकास काम केले बघ. पण आता कोणाला समजू देऊ नकोस” विजयने सूचना केली.
“हे काय सांगणे झाले का विजय दादा” एवढे बोलून तो चहाचा ट्रे घेऊन बाहेर बैठकीच्या खोलीत आला. आणि पाठोपाठ विजय पण आला.
नानांनी चष्म्यातून वर विजयकडे पाहत विचारले. “काय झाला का चहा ?”
“हो.” विजय.
“माझ्यासाठी बिनसाखरेचा आहे कि साखरेचा आहे” नानांनी गुप्तपणे विचारले.
“नाना साखरेचाच आहे.” विजयने थोडे स्मित करत उत्तर दिले.
बाकीच्या मंडळींना याचे काहीच वाटले नाही. पण विजय आणि नानांचे संभाषण बरोबर झाले. नानांचा मुड एकदम छान झाला. सहा वाजत आले होते. बाकीची मंडळी दुधाच्या धारा काढायला निघून गेली. आता उरले होते फक्त नाना, बाब्या, विजय, दगडू आणि इतर सकाळची निवडक मंडळी. दगडूने विषयाला हात घातला. नाना आपल्याला जायचे आहे ना आबासाहेबाकडे.
“हो. जाऊया कि. अजून वेळ आहे.” नानांनी उत्तर दिले.
“बर निरोप धाडला होता का?” दगडूने परत प्रश्न विचारला.
“हो धाडला होता कि” नाना.
नाना तुटक उत्तर देत आहेत हे पाहून दगडूने पुढे काहीच विचारले नाही. तेवढयात विजयचे गावातले मित्र आले. नानांना नमस्कार करून ते बसले. नाना त्यांना बघत म्हणाले. “काय पोरांनो बर हाय ना”
सर्वानी हसत एकसुरात हो असे म्हटले.
“बर आता तुम्ही आलाच आहात तर त्या याद्यातून बाहेर गावी किती गेलीत याची यादी करा. लग्न झालेल्या मुलींची पण यादी करा” नानांनी त्यांना काम सांगितले. आणि दगडूला सांगितले त्यांना जरा मदत कर.
मुले प्याड, कागद, पेन आणि याद्या घेऊन बसले. दगडू त्यांना सांगू लागला.
सात वाजले होते. दगडूने नानांना घड्याळीकडे पाहत खुनवले. नानांनी हाताचा इशारा करून थांबण्यास सांगितले. एक तास गेला एक नंबर वार्ड ची यादी छाटून झाली. आठ वाजले होते. प्रचारासाठी लावलेली रिक्षा दारात येऊन उभी राहिली. नाना उठून बाहेर गेले. दगडूहि उठला. त्यालाही नानांशी बोलायचे होते. नानांनी रिक्षावाल्याला पैशे दिले. तो निघून गेला. नाना दगडूला उद्देशुन बोलले. “मला वाटते आज न जाता उद्या गेलेलेच बरे राहील काय ?”
“मी पण हेच सांगण्यासाठी बाहेर आलो होतो” दगडू म्हणाला.
“ठीक आहे. मग उद्याच जाऊया. आज ह्या यादीचे काम संपवू या” नाना .
“हो” दगडूने होकारार्थी मान हलवली.
इकडे भाऊंची अस्वस्थता वाढत होती. भाऊ हिम्मतची वाट पाहत होते. हिम्मतला भाऊंनी नानांच्या घरावर पाळत ठेवायला सांगितली होती. जसे ते आबासाहेबाला भेटायला घरातून निघतील तशी खबर देण्याची कामगिरी त्याच्यावर सोपवली होती. पण सव्वा आठ वाजले तरी त्याचा पत्ता नव्हता. भाऊ विचारमग्न होते. प्रमोदच्या बोलण्याने ते भानावर आले.
“भाऊ मला वाटत ते काही जाणार नाही. आपण जायचे का?”
“हो ना साडे आठ वाजत आले तरी हिम्मत निरोप घेऊन आला नाही.” भाऊ म्हणाले.
इतक्यात हिम्मत आला “भाऊ” त्याने हाक मारली.
भाऊ, शामराव आणि प्रमोद उठून बाजूला गेले. हिम्मत पण तेथे आला.
“भाऊ. मला वाटत ती अफवा होती. कारण तिथे तसे काहीच वातावरण दिसले नाही. नाना आणि विजय दोघेही घरातच होते.” हिम्मतने माहिती दिली.
“पण. असं कसं होऊ शकत. कारण दुपारी तो बाब्या आबासाहेबाकडे गेला होता” प्रमोदने शंका उपस्थित केली.
“काय झाले असेल. आपण जायचे का?” भाऊंनी शामारावाना प्रश्न केला.
“एक शक्यता हि होऊ शकते कि आबासाहेबांनी भेट नाकारली असेल.” शामारावांनी मनातली शक्यता बोलून दाखवली.
“हं… अस होऊ शकत.” भाऊंनी हुंकार भरला.
“मग आपण जायचे का ?” भाऊंनी पुन्हा शामरावांना प्रश्न केला.
“हा. आपण जाऊ शकतो.” शामारावांनी उत्तर दिले.
“चला मग आपण निघूया. हिम्मत तू घरावर लक्ष ठेव आणि पोरांना लाऊन त्या याद्या छाटायचे काम करून घे. बाहेर गावाचे किती मतदान आहे त्याचा आकडा काढायला पाहिजे. मी, तात्या, मधुकर नाना , गोरख आबा, शामराव आणि प्रमोद जरा जाऊन येतो आबासाहेबाकडे.” भाऊंनी सूचना दिली.
“हो” हिम्मतने मान हलवली.
ठरलेले लोक बाहेर आले. व काय काय बोलायचे यावर चर्चा करू लागले.
“आपल्याला खुपच शांत डोक्याने साम, दाम दंड आणि भेद या नीतीने जायचे आहे. आपली भाषा एकदम नाजूक असली पाहिजे. त्यांना वाटले पाहिजे कि ते आपल्या सोबत आले म्हणजे यात त्यांचा पण फायदा आहे.” शामराव बोलले.
“ठीक आहे.” भाऊंनी पाठींबा दाखवला.
ते सहाजन आबासाहेबाकडे जाऊन पोहचले. आबासाहेबांचे नुकतेच जेवण आटोपले होते. व ते टीव्हीवर मराठी बातम्या पाहत होते.
“राम राम. आत येऊ का.“ असे म्हणत शामराव आणि भाऊ आणि इतर मंडळी आत आली.
“शामराव. आज कसकाय आठवण झाली या आबाची. बसा ” आबांसाहेबांनी पहिला टोला दिला. आणि टीव्ही बंद केली.
शामराव, भाऊ आणि मधुकर नाना तिघे समोरच्या पलंगावर बसले. आणि तात्या, प्रमोद आणि गोरख आबा बाजूच्या कोचावर बसले. आबासाहेब आराम खुर्चीत बसले होते. आवाज ऐकून आबांचा मुलगा प्रकाश पण खाली बैठकीच्या खोलीत आला. आबासाहेबांनी आधीच सर्व विचार विनिमय प्रकाश सोबत केला होता. आणि प्रकाश चे पण हेच मत होते कि भाऊ पेक्षा नानाच बरा. आणि त्यातून फायदाच जास्त होता.
“आठवन. आठवण तर नेहमीच असते.” शामरावांनी थोडे स्मित करत सांगितले.
“हं… बोला काय काम काढलंत?” आबासाहेबांनी सरळ प्रश्न विचारला.
“कामांच अस आहे आबासाहेब.” भाऊंनी बोलायला सुरुवात केली. “मी माफी मागायला आलो आहे. मागच्या वीस वर्षापासून आपण सोबत होतो. आणि मागच्या वर्षी जी काहि चुकी झाली असेल माझ्या कडून त्याबद्दल मला माफ करा.”
“चुकीची जाणीव आत्ता झाली तुम्हाला. हे चुकी करण्यापूर्वी नाही आले का मनात.” आबासाहेब थोडे रागात आले होते.
“आबासाहेब आता झाले गेले गंगेला मिळाले. आपला लहान भाऊ समजून माफ करा भाऊंना.” शामरावांनी मध्यस्थी केली.
“माफीचा काही प्रश्नच येत नाही. आणि मी माफ करणारा कोण आहे. ह्या म्हाताऱ्या कडून कसली माफीची अपेक्षा करतात” आबासाहेबांनी दुसरा टोला लगावला.
शामारावांना समजत होते कि आबासाहेब बिलकुल चिटकू देत नाहीयेत पण परत एकदा प्रयत्न करून पहावा म्हणुन ते बोलले. “एवढी काय अडी मनात ठेवातायेत. भाऊंनी माफी मागितली आहे. तुम्ही पण मोठे मान करून त्यांना माफ करावे अशीच सर्वांची इच्छा आहे. तुम्ही एकत्र आले तर यात दोघाचाहि फायदा आहे”
“शामराव फायद्याच्या गोष्टी मला सांगू नका. मागच्या वर्षी केलेला फायदा अजून उपभोगातोय मी” आबासाहेब रागात बोलत होते. “आणि मला अजून फायद्याची अपेक्षा नाही.”
“ठीक आहे.” भाऊ उठून उभे राहिले. त्यांना समजून आले होते कि आता जास्त बोलण्यात काही अर्थ नाहीये. “ आबासाहेब पण एक गोष्ट लक्षात ठेवा. तुम्हीपण कधीतरी चुकलेच असाल. त्याची बी माफी मिळायची नाही.”
प्रकाशाला एकदम राग आला. “ये भाऊ धमकी कोणाला देतो. चल निघ येथून.”
तसा प्रमोद पुढे झाला. “हा जातोय. पण याद राख पाहून घेयील तुला मी.”
“हा पाहून घे मी काही कुठे जात नाही. “ प्रकाश थोडी चाल करून गेला.
शामराव मध्ये आले आणि आबासाहेब पण खुर्चीतून उठले. “चल प्रमोद” शामराव प्रमोदच दंड धरत खेचत बाहेर नेले.
ते पायरी उतरून निघून गेले तरी प्रकाश आतमध्ये धुमसत होता.
“आबा काहीबी झालं तरी हा भाऊ निवडणूक जिंकता काम नये.” प्रकाश म्हणाला.
“नाही जिंकणार तो. तू शांत हो. उद्या आपण पूर्ण तयारीनिशी नानांच्या बाजूने उतरायचे.” आबांनी उत्तर दिले.
सर्व मंडळी पुन्हा भाऊच्या घरी आली.
“हे काही ठीक झाले नाही” शामराव बोलले.
“काही हरकत नाही भाऊ. आपण आता जास्त ताकदीने उतरायचे. थोडा जास्त पैसा खर्च झाला तरी चालेल पण हि निवडणूक जिंकायचीच.” प्रमोद तावातावात बोलत होता.
“हो नक्कीच” भाऊ पण ठाम निर्धाराने बोलत होते.
नानांनि एक माणूस आबासाहेबांच्या घरावर लक्ष ठेवायला पाठवला होता. तो परत आला. नाना आणि विजय उठून बाहेर गेले. नानांनी त्याला विचारले “काय झाले चुडामन?”
“नाना, तिथे भाऊ, प्रमोद, शामराव, मधुकर नाना, तात्या आणि गोरख आबा अशे सहा जन आले होते. बरोब्बर पावणे नऊ वाजता आले. मग पंधरा मिनिटानंतर प्रकाशने त्यांना घराबाहेर काढले.” चुडामणने वृतांत सविस्तर सांगितला.
“पण त्यांचे काय बोलणे झाले काही कळले का?” विजने विजारले.
“नाही ते काही कळले नाही. पण जाताना प्रमोद प्रकाशाला धमकी देत होता पाहून घेईल म्हणुन” चुडामण.
“म्हणजे तू जसे म्हणत होता अगदी तसेच झाले. विजय” नाना विजय कडे स्मित करत पाहत बोलले.
“हं.. आता आपला मार्ग मोकळा झाला. पण तरीही गाफील राहून चालणार नाही. उद्या सकाळी अकरा वाजे नंतर आपण जाऊ.” विजय बोलला.
एव्हाना दगडू पण तिथे आला होता. “अकरा वाजे नंतरच का लवकर जाऊयाना” दगडू म्हणाला.
“अकरा वाजेनंतर का याचे कारण तुम्हाला उद्या कळेल” विजय म्हणाला.
प्रचाराचा आज चौथा दिवस होता. विजयने रिक्षावाल्याला गावात प्रचार फेरी मारायला पाठवले. लोकं परत जमा होऊ लागली होती. उद्या महाप्रचार फेरी काढायची होती. त्यामुळे आजच सर्व तयारी करावी लागणार होती. फेरीत जास्तीत जास्त लोकं यावीत म्हणुन आज पासूनच लोकं जमवावे लागणार होते. आज गावातल्या तरुण मंडळींना रात्री बाहेर जेवायला घेऊन जाण्याचा बेत विजयने आखला होता. त्यासाठी एक ४०७ गाडी देखील सांगितली होती. कालचा झालेला प्रकार सर्व गावालाच माहित झाला होता. सर्व ठिकाणी तीच चर्चा चालू होती.
आबासाहेब आणि प्रकाश नाना येणार म्हणुन घरीच थांबले होते. दहा वाजले तरी नाना अजून आले नाही म्हणुन ते विचार करत होते. ह्या भाऊ ला धडा शिकवायचाच. पण हा नाना पण अजून येत नाही. काय झाले असेल. सकाळपासून तीनदा चहापाणी झाले होते. तरी अजून नानांचा पत्ता नव्हता. प्रकाश आबांना म्हणाला.
“आबा जास्त ताणून धरू नका. जर नाना अटी मान्य करत नसेल तरी चालेल. पण ह्या भाऊला धडा शिकवायचाच. त्याची हिम्मत कशी झाली आपल्या घरी येऊन आपल्यालाच धमकी देण्याची.” प्रकाश म्हणाला.
“मी पण तोच विचार करतोय. च्यायला पण हे एव्हाना यायला हवे होते. अकरा वाजले.” आबा म्हणाले.
“गडी पाठवू का आबा, नानाकडे” प्रकाशने विंचरले.
“हम्म. नाम्याला पाठव. त्याला म्हणा आबा बाहेर जाणार आहेत भेटायला येणार होते काय झाले? अस विचारायला सांग ” आबा म्हणाले.
प्रकाशने नाम्याला पाठवून दिले आणि त्याची येण्याची वाट पाहू लागला.
“विजय” नानांनी विजयाला हाक मारली.
विजय आला. “काय झाले नाना. हाक मारलीत.”
“हो. अरे तो नाम्या आला होता. आबासाहेबांचा गडी. विचारत होता भेटायला येणार होते काय झाले म्हणुन. मी सांगितले येतो म्हणुन.” आबांनी स्मित करत करत विजयाला सांगितले. त्यांचा चेहरा खुलला होता.
“म्हणजे त्यांची बार्गेनिंग पावर संपली तर” विजय पुटपुटला.
“काय?” नानांनी विचारले.
“नाना आता पहाच तुम्ही, आबासाहेब आता आपल्याला नुसती साथ देणार नाही तर आर्थिक पाठबळ पण देतील.” विजय बोलला.
“वा वा वा. असे झाले तर मग सोन्या हून पिवळे होईल बघ.” आबा खुशीत येऊन म्हणाले.
“चला. आपण पाच – सहा लोकं जाऊया. दगडू, पंडित भाऊ, अण्णा आणि बापूला घेऊन जाऊया.” विजयने सांगितले.
“राम राम. “ नानांनी आत येताच आपसाहेबांना नमस्कार केला.
आबासाहेब पण उठून उभे राहिले. “या या या. बसा.”
नाम्या पाणी घेऊन आला. व सर्वाना दिले.
“बराच उशीर झाला यायला” आबासाहेबांनी सुरवात केली.
“हो उद्या प्रचार फेरी आहे त्याची तयारी चालू आहे. “ नाना म्हणाले.
“हा तुमचा छोकरा ना. काय नाव.. “ थोडे आठवण्यासारखे करून ”.. विजय…. खूप हुशार आहे. एल.एल .बी. करतोय ना” आबासाहेब चांगले वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करत होते.
“हो.” विजयने होकारार्थी मान हलवली.
“मग काय म्हणते तयारी.” आबांसाहेबांनी मूळ विषयाला हात घातला.
“तयारी तर जोरात चालू आहे. ह्यावेळी काहीही झाले तरी जिंकायचेच ठरवून उतरलोय.” नाना म्हणाले.
“हं.. होईल हो. तुम्हीच जिंकणार. आणि ह्या भाऊचा मुजोर पणा फार वाढला आहे. काल आला होता माझ्याकडे. माफी मागितली आणि मदत मागत होता. मदत नाकारली तर धमकी देत होता.” आबासाहेबांनी सर्व हकीकत सांगितली.
“त्याला ह्या वर्षी पाडायचाच बघा. जास्त झालंय त्याला” प्रकाश बोलला.
“बघा आपले विचार मिळतायेत म्हणुन देवाने आपल्याला भेटवले.” बापू बोलला.
“आबा पण तुमच्या संस्थेचे मास्तर फार त्रास देतायेत. ते भाऊचा प्रचार करत आहेत. त्याचा काहीतरी बंदोबस्त करा.” दगडू म्हणाला.
“हो आलाय ते माझ्या कानावर पण. बघतो त्यांना. संध्याकाळी त्यांची मिटींग बसवतो तुमच्या घरी मग तर झालं.” आबासाहेबांनी आश्वासन दिले.
“आणखी एक विनंती होती.” विजय बोलला.
“उदयाच्या प्रचार फेरीला जर तुम्ही असलात तर बर होईल.” विजयने विनंती केली.
“मी आता जास्त कुठे फिरत नाही. पण प्रकाश येयील. सोबत मास्तरांना पण पाठवतो.” आबासाहेब म्हणाले.
“आणखी काही मदत.” आबासाहेबांनी विचारले. आणि बाजूच्या ड्रावर मधून एक पाकीट काढले. “हे पन्नास हजार रुपये आहेत राहुद्या तुमच्याकडे. आणखी काही गरज लागली तर सांगा मला.“
चहापाणी झाले. थोड्या आवांतर गप्पा झाल्या.
“बर मग निघतो आम्ही. संध्याकाळी या.” सर्व मंडळी उठली.
रस्ताने जाताना न राहवून नानांनी विचारले. “तुला कसे कळले कि आबासाहेब पैशाची मदत करतील म्हणून?”
“नाना शिक्षणाचे अनेक फायदे आहेत. त्यातलाच हा पण एक फायदा आहे. समोरच्याची मनस्थिती काय आहे हे ओळखण्याची कला देखील अवगत होते शिक्षणाने. कॉलेज मध्ये खूप मोठ मोठ्या राजकारणी लोकांची पुस्तके वाचतो मी त्याचाच हा फायदा आहे.” विजय स्मित करत बोलला.
“चांगल आहे.” आबांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता.
संध्याकाळ झाली होती. सहा वाजले. सर्व शिक्षकांना दुपारीच आबासाहेबांचा निरोप गेला होता. ठरल्याप्रमाणे सर्व शिक्षक नानांच्या घरी आले होते. काल व आज घडलेली सर्व हकीकत त्यांना माहित झाली होती. सर्व शिक्षक नानासाहेबांच्या बैठकीच्या खोलीत बसले होते. आबासाहेब व प्रकाश आले. त्याच्यासोबत इतर सदस्य पण आले. आबासाहेब व प्रकाश नानासाहेबांच्या बाजूला भिंतीला टेकून गादीवर बसले. राम राम शाम शाम झाले. आबासाहेबांनी बोलायला सुरुवात केली.
“आपल्या गावाचे इलेक्शन लागले आहे. याची तर आपल्या सर्वाना माहिती आहे. तर माझी अशी इच्छा आहे कि तुम्ही सर्वांनी नानांना मदत करावी. मला असे कळले आहे कि तुम्ही भाऊचा प्रचार करत आहात. तर तो आता बंद करा आणि नानांचा प्रचार करावा. कोणाला काही शंका आहे का?”
सर्व शिक्षक खाली मान घालून बसले होते. आणि आबासाहेबांच्या ह्या प्रश्नाने एकमेकाकडे पाहू लागले. बऱ्याच शिक्षकांना हे आवडले नव्हते. कि त्यांनी नानांचा प्रचार करावा. एकंदरीत सर्व शिक्षकांचे चेहरे पाहून आबासाहेबांना काय समजायचे ते समजले. त्यांनी पुन्हा बोलायला सुरुवात केली.
“चला मला एक गोष्ट आठवली ती सांगतो. एका जंगलात एक माकडीण व तिचे पिल्लू राहत होते. त्यांचे घर नदी किनारी होते. माकडीनीला तिचे ते पिल्लू खूप आवडायचे. ते देखील आपल्या आईच्या पोटाला चिपकून जंगलात फिरायचे. माकडीण रोज त्याचे अंग साफ करायची. त्याला जी फळे आवडतात ती तोडून द्यायची. त्यांचे खूप सुखात चालले होते. पण एके रात्री जोरदार पाऊस सुरु झाला. आणि रात्रीतच नदीच्या पाण्याने ते राहत होते त्या झाडाला वेढा दिला. सकाळ झाली तेव्हा पाणी खोडाच्याही वरती आले होते. त्यामुळे त्यांना झाड सोडून जातही येत नव्हते. दिवसा देखील पाऊस कमी झाला नाही. पाण्याची पातळी सतत वाढत होती. ती थोड्या थोड्या वेळाने झाडाच्या शेंड्याकडे सरकत होती. पण आता ती सर्वात वरती आली होती. चहूबाजूला पाणीच पाणी दिसत होते. आता जर पाणी वाढले तर काय करावे हे तिला समजत नव्हते. ती तशीच आपल्या पिलाला घेऊन उभी होती. पाऊस चालूच होता. पाणी तिच्या गुढग्या पर्यंत आले. नंतर कमरे पर्यंत आले. तिने पिलाला खांद्यावर घेतले. ती मनोमन देवाला प्रार्थना करू लागली कि पाऊस बंद होऊ दे. पण पाऊस वाढतच होता. आता पाणी तिच्या खांद्याला लागू लागले. तिला आता काहीच समजत नव्हते. तिला तिच्या पिलाची चिंता होत होती. ते पण खूप भेदरलेले होते. आता पाणी तिच्या नाकाला लागू लागले. आता तर तिला श्वास घ्यायला देखील त्रास होऊ लागला. ती विचार करू लागली. आता काय करायचे. थोड उंच होता आले तर बर होईल. असे तिला वाटू लागले. अचानक तिच्या मनात आले कि जर आपण आपल्या पिल्लाला पायाखाली घेतले तर थोडे उंच होऊन श्वास तरी घेता येईल. आणि जगलो तर असे अनेक पिल्ले जन्माला घालता येतील. तिने एका हाताने ते पिल्लू खेचून पायाखाली घेतले. आणि तिला श्वास घ्यायची मोकळीक झाली.”
दोन तीन क्षण थांबून आबासाहेबांनी परत बोलायला सुरुवात केली. “ती माकडीण जगली कि मेली तो भाग गौण आहे. पण ते पिल्लू मेले हा भाग महत्वाचा आहे. तेव्हा माझी एक विनंती आहे. माझ्या नाकापर्यंत पाणी येऊ देऊ नका.”
सारे वातावरण एकदम शांत झाले होते. काही शिक्षकांच्या चेहऱ्यावर पुसुटशी भीती देखील दिसत होती. शिक्षकांच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला होता.
आबासाहेबांनी पुन्हा स्पष्ट आवाजात विचारले “कुणाला काही शंका आहे का?”
एक शिक्षक सर्व शिक्षकांच्या वतीने बोलला. “आबासाहेब तुम्ही जिथे सांगाल तिथेच आमचा पाठींबा आहे.”
सारे वातावरण थोडे सैल झाले. “उद्या प्रचार फेरी आहे तेव्हा सर्व शिक्षकांनी हजर राहायचे. आणि जास्तीत जास्त मतांच्या फरकाने नाना विजयी झाले पाहिजे.”
सर्वांनी एकसुरात हो असे म्हटले.
आबासाहेब विजय कडे पाहत म्हणाले. “विजय आज सर्व शिक्षकांना पण जेवायला बाहेर घेऊन जा.”
“हो.” विजय म्हणाला.
बैठक संपली. विजय शिक्षकांना तसेच गावातील तरुण मंडळींना गावाबाहेरील हॉटेलात घेऊन गेला.
दुसरा दिवस सुरु झाला. स्वच्छ सूर्यप्रकाश पडला होता. आठ वाजता फेरी सुरु झाली. पस्तीशशे मतदानाच्या गावात सहा सातशे लोकं फेरीला हजार होती. मध्ये दोन ठिकाणी चहा ची सोय केली होती. आणि शेवटी पोहे आणि चिवडा होता. त्यामुळे बरेच लोकं शेवट पर्यंत फेरीत हजार होते. फेरीत नानासाहेब पुढे होते. बाजूला प्रकाश, आणि विजय होते. विजयचे मित्र जोरजोरात घोषणा देत होते.’नानासाहेबांचा विजय असो’, ‘येऊन येऊन येणार कोण नानांशिवाय आहेच कोण’ यासारख्या घोषणांनी वातावरण भरले होते. नाना प्रत्येक घरी जाऊन आपले निवडणूक चिन्ह समजावून सांगत होते. शिक्षक देखील लोकांना नानानच मतदान करा म्हणुन विनवणी करत होते. महादेवाच्या पारावर नानांनी भाषण दिले. आपल्या भाषणात भाऊ वर हल्ला चढवला. रस्ते, पाणी, गटारी आणि महिलासाठी स्वच्छतागृह यांची आश्वासने दिली. विजय व प्रकाश दोघानीही भाषण केले. प्रचार फेरी चांगलीच यशस्वी झाली होती. दुपारी बारा पर्यंत संपूर्ण गावाला फेरी मारून नानासाहेब व इतर मंडळी घरी आली. पुन्हा एकदा चहा पाणी झाले.
भाऊंनी पण उद्या प्रचार फेरी काढायचे ठरवले होते. त्यासाठी त्यांची तयारी चालू होती. त्यांनी नानांच्या प्रचार फेरी ला झालेली गर्दी पहिली होती. त्यांना त्यापेक्षा अधिक गर्दी जमवायची होती. त्यासाठी दुपारी प्रचार फेरी नंतर बोकडाचा बेत त्यांनी केला होता. त्यांना आबासाहेबांनी नानांना दिलेला पाठिंब्याबद्दल माहिती मिळाली होती. आणि शिक्षकांना दिलेला दम देखील कळला होता. त्यामुळे त्यांचा आतून जळफळाट होत होता. भाऊ विचार करत होते कि आता काय करावे. कशा पद्धतीने आपल्याला विजय मिळवता येईल. पण त्यांना त्यातून काही मार्ग मिळत नव्हता. काहीतरी विचारांची तंद्री लागली असतानाच त्यांना शामारावांनी विचारले “काय विचार करतायेत भाऊ?”
भाऊंनी त्यांना इशारा करत सांगितले. “दोन मिनिटे आत चला”
तसे लगेच शामराव उठले. आणि आत गेले. “काय झाले भाऊ?”
“शामराव मला असे वाटत आहे कि आपण कुठे तरी कमी पडतोय. आपण पाटील साहेबांना भेटायचे का?” भाऊंनी मनातला विचार बोलून दाखवला.
“नाही भाऊ आपण सर्व ठीक करू. आणि पाटील साहेबांना भेटून काय करायचे?” शामराव कोडयात पडले होते.
“नाही पण एकदा भेटूया. मला असे वाटतंय कि ते काहीतरी मार्ग सुचवतील.” भाऊ म्हणाले.
हे पाटील साहेब म्हणजे स्थानिक आमदार होते. भाऊंनी त्यांना इलेक्शनच्या वेळी खूप मदत केली होती. त्यांना राजकारणाची चांगली जान होती. ते जास्तकरून मुंबईलाच असत पण आता संपुर्ण तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूक होती म्हणुन ते तालुक्याच्या आपल्या निवास्थानी होते.
“ठीक आहे. भेटायला तर काही हरकत नाही. उदया संध्याकाळी प्रचार फेरी नंतर जाऊया.” शामराव म्हणाले.
दुसऱ्या दिवशी सकाळीच भाऊंची प्रचार फेरी झाली. नंतर बोकडाचे जेवण असल्यामुळे बरेच लोकं फेरी साठी हजार होते. नानाच्या गर्दी इतकी गर्दी जमवण्यात भाऊंना यश आले होते.
संध्याकाळी शामराव आणि भाऊ फक्त दोघेच जीपने तालुक्याला गेले. तालुक्याचे गाव फक्त वीस किलोमीटर होते. रस्त्यात फार काही बोलणे झाले नाही. भाऊंना चिंता लागली होती. बंगल्याच्या गेट पासून गाडी दोनशे मीटर वर पार्क करावी लागली. शामराव आणि भाऊ गेटवर आले. व्हीझीटिंग पास बनवला. भेटण्यासाठी नऊ वाजून दहा मिनिटाची वेळ मिळाली होती. अनेक लोकं भेटायला आलेली होती. नऊ वाजायला अजून दोन तास वेळ होता. भाऊ आणि शामराव गार्डन मध्ये टाकलेल्या खुर्चीत जाऊन बसले. दोन तास कसा तरी टाईम पास केला. तरी भेट मिळायला दहा वाजले.
पाटील साहेबांचा सेक्रेटरी त्यांना आत घेऊन गेला. पाटील एका मोठया खुर्चीत बसले होती. समोर काच ठेवलेला लाकडी नक्षीदार टेबल होता. भिंतीवर निरनिराळे चित्र लावले होते.
“नमस्कार.” भाऊंनी दोन्ही हात जोडून आत येतानाच नमस्कार केला.
“नमस्कार.. या बसा.” पाटील साहेब म्हणाले.
भाऊ आणि शामराव पाटील साहेबांसमोर खुर्चीत बसले.
“काय कसा चालू आहे प्रचार?” पाटील साहेबांनी प्रश्न केला.
“चांगला चालू आहे.” भाऊंनी उत्तर दिले.
“अच्छा. काय काम काढले?” पाटील.
“तुमचे थोडे मार्गदर्शन हवे होते.” भाऊंनी उत्तर दिले.
“मार्गदर्शन.. बोला ना “ पाटील साहेबांच्या चेहऱ्यावर थोडे स्मित उमटले.
“खर सांगायचे तर ह्यावेळी गावाचे वातावरण काही समजत नाही बघा. ह्यावेळी आबासाहेब पण आमच्या सोबत नाहीत. आणि त्यांनी शिक्षकांना देखील नानाकडे वळवले आहे. त्यामुळे थोडी पंचायीत होत आहे. ह्यातून काय मार्ग काढावा ते समजत नाहीये.” भाऊंनी सर्व परिस्थिती विषद केली.
पाटील साहेबांनी सर्व म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. “हं …” म्हणुन ते थोडा विचार करू लागले.
“कसं आहे भाऊ. राजकारण हे खर तर बुद्धिबळासारखे असते. यात समोरचा काय खेळू शकतो आणि काय खेळू शकत नाही ते पाहून चाल चालायची असते. जे मातब्बर खेळाडू असतात त्यांना ह्या गोष्टी माहित असतात. त्यामुळे जिंकन खुपच अवघड असते. पण तरीदेखील एखादी अशी चाल असते कि जी समोरचा खेळाडू खेळेल अस प्रतीस्पर्धाला वाटतच नाही आणि तीच चाल निर्णायक ठरते. तुम्ही जर थोडा विचार केला तर तुम्हाला देखील अशी एखादी निर्णायक चाल जरूर मिळेल.”
काही क्षण असेच गेले. भाऊंना शांत पाहून पाटीलसाहेब म्हणाले. “कसला विचार करतायेत भाऊ?”
“काही नाही..” भाऊ उत्तरले.
“साहेब आपल्याकडून काही मदत होईल का. ह्यावेळी आबासाहेबांनी देखील पाठींबा दिला नाही तेव्हा आर्थिक बाजू थोडी कमकुवत आहे.” शामारावांनी खडा टाकून पहिला.
“शामराव तुम्ही आणि भाऊंनी आम्हाला नेहमीच मदत केली आहे.” असे म्हणुन त्यांनी सेक्रेटरी कडे पहिले व त्याला उद्देशुन म्हणाले. “यांना दोन लाख रुपये देऊन दे.”
“खूप मदत झाली तुमची. आम्ही नेहमीच तुमच्या सोबत राहू.” शामाराव दोन्ही हात जोडून हसत हसत आभार मानले.
“आभारी आहे. खूप खूप आभारी आहे.. साहेब..” भाऊंनी पण दोन्ही हात जोडले.
“कोणाला कळू देऊ नका.” पाटील साहेबांनी स्पष्ट सांगितले.
“हे काही सांगण झाले का साहेब.” शामाराव म्हणाले.
“ठीक आहे साहेब.. आता निवडणूक जिंकुनच भेटायला येतो.” भाऊंच्यात एक नवा आत्मविश्वास संचारला होता.
भाऊ आत्मविश्वासाने बाहेर आले. खिशात पाकीट होते. ते सरळ जीपकडे गेले.
जीप मध्ये देखील भाऊ शांतच होते. ते निर्णायक चालीचा विचार करत होते. त्यांना असे विचार मग्न बघून शामारावांनी विचारले “कसला विचार करतायेत भाऊ?”
“मी विचार करतोय कि आता काय करावे. नानाला कशी मात द्यावी ?” भाऊ म्हणाले.
“मग सुचले का काही ?” शामारावांनी पुन्हा प्रश्न केला.
“हं .. सुचले तर आहे.” भाऊंनी उत्तर दिले.
“सांगा ना मग आपली पुढची खेळी काय असेल?” शामारावांची उसुकत्ता शिगेला पोहोचली होती.
“आपल्याला शिक्षकांना आपल्याकडे वळवावे लागेल. त्यानानंतर बाकीच्या चाली. तुम्ही असे करा उद्या शिंदे मास्तर आणि भदाणे मास्तर यांना तालुक्याच्या गावी बोलावा. पण या कानाची त्या कानाला खबर होता काम नये.” भाऊंनी शांतपणे सांगितले. शामरावांना आता काहीच प्रश्न नव्हते. पूर्ण रस्ता शांततेत गेला.
दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता भाऊ तालुक्याला गेले. बरोबर शामराव होतेच. बरोबर नऊ वाजता शिंदे मास्तर आणि भदाणे मास्तर तालुक्याला एक हॉटेलात आले. भाऊंनी त्यांना नमस्कार केला. दोघे मास्तर इकडे तिकडे बघत खुर्चीत बसले.
“काय बघतायेत मास्तर? इथे आबाचे कोणी नाही. घाबरू नका.” भाऊ म्हणाले.
“नाही घाबरायचे काय आहे त्यात. आपण एकाच गावाचे माणस. आपल्याला भेटायला काय चोरी आहे का?” शिंदे मास्तर म्हणाले.
“तेहि आहे म्हणा.” शामाराव मान डोलवत म्हणाले.
“काय काम आहे ?” भदाणे मास्तरांनी विचारले.
“काम काही नाही. मदत हवी होती. तुम्ही आपली माणसे म्हणुन तुम्हाला बोलावले.” भाऊ म्हणाले.
“सांगा ना” शिंदे मास्तर म्हणाले.
“आधी चहा घेऊया.” भाऊ म्हणाले. “ये चार चहा आनरे.” भाऊंनी हॉटेलातल्या एक मुलाला चहा आणायला सांगितले.
“तुम्ही पार माया काढून घेतली मास्तर आमच्यावरून.” शामराव म्हणाले.
“नाही हो तसे नाही पण तुम्हाला पण गावातले वातावरण माहित आहे. आमच्या नोकरीचा सवाल आहे.” शिंदे मास्तरांनी स्पष्टीकरण दिले.
“मग आता तुम्ही मदत करू शकता कि नाही? तुमच्या मदतीची गरज आहे आम्हाला.” भाऊ म्हणाले.
“राग नका वाटू द्या भाऊ पण ते आता शक्य नाही. तो आबासाहेब फाडून खाईल.” शिंदे मास्तर म्हणाले.
“आम्ही रस्त्यावर येऊ भाऊ.” भदाणे मास्तरांनी ह्री ओढली.
“हे बघा तसे काहीच होणार नाहीये. आणि एकदा निवडणूक मी जिंकलो तर तुमच्या केसाला पण धक्का लागू द्यायचो नाही मी. पण जर का मी हरलो तर मात्र तो आबासाहेब नेहमीच तुमची गळचेपी करेल.” भाऊ म्हणाले.
“तुमचे म्हणने खरे आहे पण …” भदाणे मास्तर पुढे काही तरी बोलणार होते पण त्यांचे बोलणे मधेच खोडत भाऊ म्हणाले.
“पण काय आता. अहो यात तुमचा पण फायदा आहे.”
“आमचा काय फायदा?” शिंदे मास्तरांनी प्रश्न केला.
“अहो जर मी निवाडलो तर तुम्हाला सर्व मास्तरांना गावठानच्या जागेतून जागा देतो कि शिक्षक कॉलनीसाठी. आम्ही इतर गावकय्राकडून पंधरा हजार रुपये घेतो पण तुम्हाला मोफत जागा देतो.” भाऊंनी फायदा विषद केला.
भदाणे मास्तर आणि शिंदे मास्तर विचार करू लागले. तेवढयात चहा आला. सर्वजन चहा पिऊ लागले. काही क्षण तसेच शांत गेले.
“आणि एवढेच नाही. मी प्रत्येक मास्तरला दहा हजार रुपये पण देणार आहे.” हे ऐकताच दोघा मास्तरांचे चेहरे पालटले.
“पण तरी थोडी भीती वाटते.” भदाणे मास्तर बोलले.
“अहो मास्तर शाळेत, अर्थशाश्र आणि राज्यशाश्र शिकवतात तुम्ही काय एवढे घाबरतात. ह्यापेक्षा चांगली संधी मिळणार आहे का? तो आबासाहेब आणि नाना काय देणार आहेत तुम्हाला?” शामराव थोडे कडक आवाजात बोलले.
“ठीक आहे. पण आम्हाला करायचे काय आहे?” शिंदे मास्तर म्हणाले.
“हा झाला ना महत्वाचा प्रश्न.. बस तुम्हाला फक्त आमचा प्रचार करायचा आहे चोरून लपून आणि तीनशे मतदान गोळा करून द्यायचे आहे. लोकं तुमचे ऐकतात. तुमच्या विश्वासातल्य लोकांना आम्हाला मतदान करायला लावायचे. काही मतदान जर पैशे देऊन मिळत असेल तर त्यांना तुम्ही आमचे पैशे द्यायचे. आणि कोणाला काही कळू द्यायचे नाही. उदया शेवटचा एक दिवस आहे. उदया संध्याकाळी प्रचार बंद होईल. या एका दिवसात तीनशे मतदान आणून द्यायचे बस.” भाऊंनी आपली योजना सांगितली.
“ठीक आहे आम्ही बरोबर करतो.” भदाणे मास्तर म्हणाले. त्यांना माहित होते कि सर्व मास्तरांना मिळून हे काम काही अवघड नाही.
“येतो आम्ही आता.” भदाणे मास्तर उठायला लागले.
“थांबा. शामराव ते पाकीट द्या त्यांना.” भाऊ शामारावांना म्हणाले. शामारावांनी पाकीट खिशातुन काढले व शिंदे मास्तरांना दिले.
“यात एक लाख रुपये आहेत. बाकीचे निवडणूक जिंकल्यावर देतो.” भाऊ म्हणाले.
शिंदे आणि भदाणे मास्तर खुपच खुश झाले. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता.
“भाऊ तुम्ही आता काही काळजी करू नका, आम्ही सर्व व्यवस्थित करतो.” भदाणे मास्तर म्हणाले .
“ठीक आहे. पण एक काम करा तुमचे जे तीनशे मतदान राहील त्याची यादी मला उद्या सकाळ पर्यंत कळवा.” शामराव म्हणाले.
“चालेल.” शिंदे मास्तर म्हणाले.
“ठीक आहे या तुम्ही आता. आणि लागा कामाला.” भाऊ म्हणाले.
“राम राम..” दोघेही मास्तर उठले. आणि बाहेर गेले. भाऊ आणि शामराव चर्चा करू लागले.
“भाऊ आता पुढे काय?” शामारावांनी भाऊंना प्रश्न केला.
“शामराव आपल्या गावातील टोटल मतदान किती आहे?” भाऊंनी प्रती प्रश्न केला.
“पस्तीशशेच्या आसपास आहे.” शामारावांनी उत्तर दिले.
“हं. चौतीसशे पंचाहत्तर. यातील वरचे चारशे साडेचारशे मतदान होत नाही. मयत म्हणा, नोकरीसाठी बाहेरगावी असे काहीतरी कारण असते.” भाऊ म्हणाले.
“हं.. बरोबर.” शामारावांनी दुजोरा दिला.
“राहिले तीन हजार मतदान. आणि वॉर्ड किती आहेत.. चार.” भाऊ म्हणाले.
“हो..” शामराव लक्षपुर्वक ऐकत होते.
“वॉर्ड क्रमांक एक, दोन व तीन मध्ये प्रत्यकी तीन उमेदवार आहेत आणि चार मध्ये दोन. म्हणजे टोटल अकरा उमेदवार रिंगणात आहेत. आणि सरपंच बनण्यासाठी आपल्याला सहा जागा हव्या आहेत. मग आपण एवढया अकरा उमेदवारावर का लक्ष दयायचे. आपण फक्त आपले लक्ष वॉर्ड क्रमांक एक आणि दोन वर केंद्रित करायचे. म्हणजे तीन व चार वर पण लक्ष दयायचे पण जास्त लक्ष एक व दोन वर दयायचे.” भाऊंनी आपली कल्पना मांडली.
“ठीक आहे.. पुढे.” शामारावांना पूर्ण योजना समजून घ्यायची होती.
“सरासरी एका वॉर्ड मध्ये आठशे मतदान होते. म्हणजे जिंकण्यासाठी चारशे एक मतदान हवे. आपल्याला तीनशे मतदान तर मिळणारच आहे. जे आपले पक्के मतदान आहे नेहमीचे. आता आपल्याला शंभर सव्वाशे मतदान हवे आहे. त्यासाठी आपण आता मास्तरांना सांगितले आहे. पंधरा मास्तरांपैकी सहा मास्तर वॉर्ड एक मध्ये येतात आणि चार मास्तर दोन मध्ये येतात. माझ्या विचारानुसार आपल्याला साठ मतदानाचा फायदा होईल वॉर्ड क्रमांक एक व दोन मध्ये. म्हणजे ते नानाचे साठ मतदान तोडतील. तीनशे साठ झाले. बाकी आदिवासी मतदान आहे दोनशे वॉर्ड क्रमांक एक मध्ये आणि दोन मध्ये दोनशे तीस त्यांना विकत घेता येयील. त्यांना सांगुया समाजमंदीर बांधून देतो. त्यांना विश्वास वाटावा म्हणुन लगेच कामाला सुरुवात करतो अस सांगुया. दोन तीन ट्रीप वाळू आणि एखादी ट्रीप विटांची टाकायला सांगू सुधाकरला. काळू आपला उमेदवार आहे त्याला सांगुया तो बरोबर त्यांना गोळा करून आणेल. आदिवासी मतदान जर निम्मे जरी मिळाले तरी जीत पक्की” भाऊ सर्व गणित मांडत होते.
“हं.. योजना तर छान आहेच. पण माझ्या कडे पण एक एक्का आहे.” शामराव म्हणाले.
“एक्का कुठला एक्का?” भाऊंनी उत्सुकतेने विचारले.
“महादू..” शामारावांनी उत्तर दिले.
“महादू …” भाऊ विचार करत होते. इतक्यात शामराव म्हणाले. “नानांच्या भावकीतला..”
“काय सांगता शामराव तो आपल्याला कसकाय मदत करेल ? तो तर नानांचा जवळचा आहे.” भाऊ उत्सुकतेने म्हणाले.
“भाऊ तो नानांचा पक्का माणूस होता. ज्यावेळी आबासाहेबांना नानाने जवळ केले. त्याच वेळी तो त्यांना दुरावला. त्याची शेताची भानगड आहे, आबासाहेबांशी.” शामारावांनी स्पष्टीकरण दिले.
“म्हणजे आपण त्याला जवळ केले पाहिजे. म्हणजे नानाची भाऊबंदकी फोडायची. याचा खूप फायदा होईल आपल्याला.” भाऊ स्मित करत म्हणाले.
“अगदी बरोबर.” शामवर देखील स्मित करत म्हणाले.
“वा काय छान होईल हा डाव. चला निघूया. आधी काळूला भेटून समाजमंदिराचे सांगुया. आणि लगेच महादूला पण भेटुन सर्व काही नीट समजावूया.” भाऊ म्हणाले.
“हं.. चला.” शामराव खुर्चीतून उठत म्हणाले.
दोघेही निघाले. गल्ल्यावर बसलेल्या माणसाला भाऊंनी चहाचे बिल चुकते केले. व दोघेही जीप मध्ये बसून गावाकडे निघून गेले.
इकडे नाना आणि विजय देखील खूप गडबडीत होते. कारण उद्या प्रचाराचा शेवटचा दिवस होता. म्हणुन त्यांनी उदया मतदारांना आकर्षित करण्यासाठी गाव जेवणाचा कार्यक्रम ठेवला होता. नाना आणि विजय सर्व योजना सांभाळत होते. कोणी काही बातमी आणली कि त्यावर चर्चा होत होती. बाहेर गावचे मतदान आणण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांना पाठवले जात होते. काही ठिकाणी जर चार पेक्षा अधिक मतदान असेल अशा ठिकाणी स्पेशल जीप नाही तर रिक्षा पाठवली जात होती. नानांच्या घरी रेलचेल खूप वाढली होती. सर्वाना थोड्या वेळाच्या अंतराने चहा दिली जात होती. आजची आणि उदया असे दोनच दिवस मतदान सांभाळायचे होते. परवा तर मतदानच होते. आपले मतदान कोणी फोडू नये म्हणुन दोघेही पक्षांचे लोकं दिवस रात्र गस्त घालत होते.
शेवटचे दोन दिवस दोन्ही पक्षाचे लोकं तहान, भूक आणि झोप विसरून काम करत होते. भाऊंनी काळू आणि महादू यांच्या भेटी घेतल्या. काळूला आदिवासींना समजवायला सांगितले. तरी शेवटपर्यंत संभ्रमाचे वातावरण कायम होते. शेवटच्या दिवशी रात्री पैसे वाटप देखील झाले. भाऊंनी तर काही मतदानासाठी एक हजार रुपये प्रती मतदान देखील दिले. नानांनी देखील सढळ हातांनी पैसे वाटप केले. आदिवासी मतदान खेचण्यासाठी आदिवासी स्रियांना लुगडे वाटले. अशा रीतीने हे दोन दिवस संपले.
प्रचार संपला होता. आता मतदानाला आजचा शेवटचा दिवस आडवा होता. गावात पोलीस दाखल झाले होते. संध्याकाळी गावात बस आली ती थेट मराठी शाळेत गेली. तिथे मतदान पेटया आणि इतर साहित्य उतरवण्यात आले. मराठी शाळेत देखील पोलीस बंदोबस्त होता. जिल्हा प्रशासनाने पोलिसांचे गस्ती पथक तयार केले होते. ते तास दोन तासाच्या अंतराने आजूबाजूच्या गावात गस्त घालून ह्या गावात येत होते. रात्र शांततेत गेली. दोन्ही पक्षाचे लोकं झोपलीच नव्हती. सकाळ झाली. नाना आणि भाऊ मतदान केंद्रावर दाखल झाले. प्रत्येक वॉर्ड साठी एक अशी चार मतदान कक्ष होते. भाऊ आणि नाना यांनी आपापल्या पोलिंग एजंट ची ओळख करून दिली. आणि मतदानाला सुरुवात झाली. नाना आणि भाऊ यांना आता शंभर मीटर दूर उभे राहिले होते. दोन्ही पक्षांनी मतदाराच्या सोयीसाठी बूथ माडले होते. तिथे मतदारांना यादी क्रमांक, वॉर्ड क्रमांक आणि मतदार क्रमांक लिहिलेली एक चिठ्ठी दिली जात होती.
विजय आणि त्याचे मित्र तसेच प्रमोद आणि त्याचे मित्र आणि पक्षाचे लोकं, उमेदवार सर्व मतदारांना काढण्यासाठी गावात हिंडत होते. वयस्क आणि ज्यांच्यावर शंका आहे अश्या मतदारांना मतदान केंद्रावर नेण्यासाठी गाड्यांची व्यवस्था केली होती. छोटया एक दोन घटना सोडल्यास मतदान शांततेत पार पडले.
आता दोघ पक्षांचे भविष्य पेटीबंद झाले होते. भाऊ आणि नाना दोघांच्याही घरी अस्वस्थता होती. रात्री आकड्याचे हिशोब चालू होते. दोघ पक्षांनी खूप पैसा खर्च केला होता. गावात देखील चर्चाना उत् आला होता. कोण निवडेल याबाबत ठोकताळे मांडले जात होते. निकाल एक दिवसा नंतर होते. दोघ पक्षांनी आपले अकरा च्या अकरा उमेदवार निवडतील अशे अंदाज मांडले होते. एकुणच संभ्रमाचे वातावरण होते. नानांच्या आणि भाऊच्या घरातल्या पैकी कोणालाच अन्न गोड लागत नव्हते. निकालाचा आदला दिवस कसा तरी गेला.
निकालाच्या दिवशी नानांनी आणि भाऊंनी आपापल्या समर्थकांना घेऊन जाण्यासाठी गाडयांची व्यवस्था केली होती. मतमोजणी जिल्हाच्या ठिकाणी एका जुन्या शाळेत होती. तेथुन एक किलोमीटर पर्यंत नो पार्किंग होते. गाड्यांना तेथेच सोडून समर्थक पायीच मतमोजणी केंद्रावर पोहोचले. संपूर्ण जिल्ह्यातुन लोकं आले होते. सर्वच ग्रामपंचायतींचा आज निकाल होता. मतमोजणी केद्रात खूप चोख पोलीस बंदोबस्त होता. बारा वाजेपर्यंत मतमोजणी साठी नंबर लागेल. अशी माहिती बाहेर आले. त्यामुळे सर्व जन बारा वाजेची वाट पाहू लागले. विजयी उमेदवारांचे नाव लाउड स्पीकर वरून पुकारले जात होते आणि किती मते मिळाले हे सविस्तर सांगितले जात होते. ज्या गावाचे निकाल लागल होते त्या गावाचे विजयी उमेदवार ढोल वाजवत गुलाल उडवत जात होते. आणि हरलेले उमेदवार गुपचूप गर्दीतून वाट काढत निघून जात होते.
बारा वाजले. एक वाजला. पण अजून नंबर आला नव्हता. पुन्हा बातमी आली पाच वाजतील निकालाला. सर्वांचा उत्साह ओसरत चालला होता. भाऊ आणि नानांची चिंता वाढत होती. शेवटी आठ वाजता मतदान अधिकारीने लाउड स्पीकर वरून गावाच्या नावाचा पुकारा केला. नानांनी आणि भाऊंनी आपापल्या मोजणी सहायकांना पुढे केले. त्यांच्या समोर मोजणी सुरु झाली. तीन व चार वॉर्ड क्रमांकाचे मतमोजणी अर्ध्या तासात झाली. एकाने बातमी सांगितली कि नानांचे तीन व चार वॉर्ड मध्ये सगळे उमेदवार विजयी झाले. नानांच्या गोटात आनंद संचारला होता. त्यांना विश्वास झाला होता कि आता आपलेच अकराच्या अकरा उमेदवार विजयी होतील. विजयला सर्वांनी मिळून खांदयावर उचलून घेतले होते.
इकडे प्रमोद वगैरे मंडळी शांत बसली होती. सर्व जन चिंता करत होते. मनोमन त्यांना वाटत होते कि आपल्या पराभवाची बातमी थोड्या वेळातच येईल. तेवढयात भाऊ आणि त्याच्या मागे त्यांचे मोजणी सहाय्यक गर्दीतून वाट काढत बाहेर आले. भाऊंच्या चेहऱ्यावर आनंद होता. भाऊंनी दुरूनच हाताने इंग्रजी व्ही अक्षराची खून केली. प्रमोद आणि त्यांच्या मित्रांनी एकच जल्लोष केला. भाऊंच्या सहा जागा आल्या होत्या आणि भाऊ देखील विजयी झाले होते. नानांच्या गोटात निकाल कळला. नाना पराभूत झाले होते. ते अंधारात केव्हा गावी निघून गेले हे कळलेच नाही.